धाराशिव (प्रतिनिधी)- भारताच्या महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असून यासाठी समर्थ विचार हा राष्ट्र उभारणीत मोठे योगदान देणारा आहे. असे प्रतिपादन समर्थ भक्त मोहन बुवा रामदासी यांनी केले.ते धाराशिव इथे ब्राह्मण कल्याण ट्रस्ट द्वारा आयोजित “श्री ब्रह्मभूषण सन्मान धाराशिव“ पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपक रणनवरे , ब्राह्मण कल्याण ट्रस्टचे अध्यक्ष एडवोकेट अभय पाथरूडकर, विपिन गंधोरकर, मुकुंद भातंबरेकर,संतोष बडवे,महेश पाठक यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मोहन बुवा रामदासी पुढे म्हणाले की समाजाची दुर्बलता, निष्क्रियता दूर होण्यासाठी समर्थांचा विचार आचरणात आणण्याची गरज आहे.ब्राह्मण समाजाने गायत्री मंत्राची दीक्षा तसेच वेद उपनिषदांत सांगितलेले आचरण आणि नित्य कर्म करण्याची गरज असून ब्राह्मणांसाठी समर्थ रामदासांनी स्वावलंबनाचे धडे दिलेले आहेत असे सांगितले.समाजातल्या त्रुटी दूर करण्यासाठी समाज संघटन करण्यासाठी समर्थांनी घालून दिलेल्या मार्गावरून चालत राहण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.ब्राह्मण कल्याण ट्रस्ट द्वारा विविध सामाजिक कार्य आणि उपक्रम यामधून श्री समर्थांचेच कार्य सुरू असल्याचे सांगून या कार्यातून सामाजिक बांधिलकी ठेवत समाज सशक्त करण्यासाठी सर्वांनी यात सहभागी होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
तर श्री दीपक रणवरे यांनी ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी या उद्देशाने पुढाकार घेऊन आपण शारीरिक कष्ट आणि त्रास सहन करून केवळ ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी उपोषण केल्याचे सांगितले. ब्राह्मण समाजासाठी आज सामाजिक काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हे कार्य ब्राह्मण कल्याण ट्रस्ट कडून होत असल्याबद्दल त्यांनी कौतुक देखील केले.ब्राह्मण समाजातील तरुण तरुणींनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे, नोकरी करणारे नाही,तर नोकरी देणारे व्हावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात धाराशिव शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ ब्राह्मण नागरिकांचा “श्रीब्रह्मभूषण सन्मान धाराशिव“पुरस्कार देऊन सत्कार देखील करण्यात आला.यात धाराशिवच्या थेट जनतेतून निवडून आलेल्या पहिल्या महिला नगराध्यक्ष डॉक्टर उर्मिलाताई गजेंद्रगडकर, धाराशिव शहरात मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर राघवेंद्र डंबळ ,धाराशिव शहरात साहित्याच्या माध्यमातून अनेक कविता कथासंग्रह तसेच साहित्य निर्मिती आणि साहित्य चळवळीला प्रोत्साहन देणारे जेष्ठ कवी राजेंद्र अत्रे, नवनवीन उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून धाराशिवकरांच्या सेवेत असणारे श्री रंगनाथराव कुलकर्णी,आणि समर्थ नगर भागातील श्रीराम मंदिराचे माजी विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते भारतराव मसलेकर यांना यावेळी श्री ब्रह्मभूषण सन्मान धाराशिव पुरस्कार श्री मोहन बुवा रामदासी यांच्या हस्ते त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे मानपत्र, स्मृतिचिन्ह,शाल, बुके अशा स्वरूपात देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुराम यांच्या प्रतिमा पुजनाने आणि दीपप्रज्वलानाने करण्यात आली.ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या कार्याची माहिती ॲड. अभय पाथ्रूडकर यांनी प्रास्ताविकात देऊन ट्रस्टच्या वतीने प्रथमच हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून यापुढे संघटनेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. श्री विपीन गंधोरकर यांनी संघटनेचे विविध उपक्रम तर संतोष बडवे यांनी संघटनेच्या व्हिजन 2035 बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, डॉ. स्वप्नगंधा कुलकर्णी,अपर्णा पाठक यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. गजानन कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी धाराशिव शहर व परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
