धाराशिव (प्रतिनिधी)- वडिलांच्या मृत्यूनंतर दोन अपत्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेल्या कुटुंबाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारामुळे दिलासा मिळाला आहे.संबंधित कुटुंबास शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सक्रिय भूमिका बजावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका खेडेगावातील एका व्यक्तीने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी तसेच वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.घरातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर मोठे संकट ओढावले असून मुलांच्या पुढील शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (बालकांसाठीची बालस्नेही विधी सेवा) योजना 2024 अंमलबजावणीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने एक समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीमार्फत जिल्ह्यातील 18 वर्षांखालील मुले,मुली व तृतीयपंथी यांच्या हितासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी कार्य केले जाते.
हे प्रकरण समितीच्या सदस्या ॲड. अरुणा गवई यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मृत व्यक्तीच्या पत्नीस आवश्यक कागदपत्रांसह सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव यांच्याकडे मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत विनंती अर्ज सादर केला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सचिव भाग्यश्री पाटील यांनी या अर्जाची तात्काळ दखल घेऊन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी संबंधित दोन्ही मुलांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याची हमी दिली.
तसेच जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांना प्रकरणाची माहिती देण्यात आली.या प्रकरणात जातीने लक्ष देऊन दोन्ही मुलांना शासनाच्या आरटीई योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी दिले. त्यामुळे या दोन्ही मुलांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आर्थिक दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, महिला, बालके व तृतीयपंथी यांच्या हक्कांसाठी विनामूल्य कायदेशीर मदत पुरविण्यात येते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे आलेल्या समस्या मार्गी लावल्या जातात.त्यामुळे या घटकांतील व्यक्तींनी अडचण असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.