धाराशिव (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्क बदनामी करणारे सर्वजण आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या महंतांनी केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र रचणारांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या निगराणीखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पोलिसांचा अहवाल प्राप्त होताच त्या सर्वांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा शब्दात राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले आहे.

ड्रग्ज प्रकरणाच्या नावाखाली काहीजणांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र रचले आहे. समस्त पुजारी आणि सेवेकरी मंडळीची जाणीवपूर्वक बदनामी करून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी रचलेल्या या षडयंत्राची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी तुळजापूरच्या महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार देत केली होती. त्याअनुषंगाने काय कारवाई झाली याची माहिती घेण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित केली होती. तुळजापूरच्या महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले? तीर्थक्षेत्र तुळजापूर आणि तुळजाभवानी मातेच्या पूजारी वर्गाची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांवर राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शासनाने यावर करावयाची कारवाई आणि प्रतिक्रिया काय? असा सवाल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून पोलिसांना तातडीने प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे सभागृहात उत्तर देताना सांगितले.


 
Top