धाराशिव ता.24: शहरातील शासकीय दुध डेअरी समोरील जागा हस्तातरण करण्यासाठी गेली अनेक वर्ष विविध संघटना संघर्ष करीत होत्या.याबाबत समाज बांधव यांना सोबत घेऊन सर्व पातळीवर पाठपुरावा केला. समाज बांधवांच्या लढ्याला यश मिळाले आहे. शासनाला उशिरा सुचलेलं हे शहाणपण असल्याची प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे. 

आमदार .पाटील म्हणाले की ,शासकीय दुध डेअरी ची जमीन हस्तांतरित करण्याचा ठराव नगरपालिकेने केला होता. त्यानुसार हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनीदुग्ध विभागाकडे पाठवला मात्र अशी जागा देता येत नाही असे कारण सांगून हा प्रस्ताव 21 एप्रिल 2023 ला शासनाकडून फेटाळण्यात आला. 

त्यानंतर समाजबांधवानी 17 ते 22 मे 2023 असे सहा दिवस उपोषण केले.तेव्हा 23 मे 2023 रोजी पुर्नेप्रस्ताव सादर करण्यास जिल्हाधिकारी यांना पत्र दिले. शासन निर्णयानुसार चार जुन 2016 चा संदर्भ दिला. त्यामध्ये लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे छत्रपती संभाजीनगर येथे स्मारक उभारण्यास शासकीय दुध योजना, छत्रपती संभाजीनगर येथील जागा हस्तांतरीत करण्यात आली होती.त्या धर्तीवर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व स्मारक उभारण्याकरीता धाराशिव शहरातील शासकीय दुध योजना डेअरी परिसरातील एक एकर जागा हस्तांतरीत करण्याबाबतचा पुर्नेप्रस्ताव देण्याचे जिल्हाधिकारी यांना आपण कळवलं होत.त्यानुसार तसा प्रस्ताव पाठवण्यात आला. समाज बांधवासह 31 मे 2023 रोजी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जागा हस्तांतरण करण्याच्या बैठकीचे आयोजन करण्याबाबत आपण स्वतः पत्राव्दारे मागणी केली. 26 जून 2023 रोजी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्‌‍द्याधारे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे याचा पुतळा व स्मारक उभारण्यासाठी जागा,निधी उपलब्ध करून देण्यासबंधी मुद्दाही मांडला.27 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्री मोहदयांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते.पण ही बैठक जाणीवपूर्वक सत्ताधारी लोकप्रतिनिधीकडून रद्द करून खोडा आणला. आपण अधिवेशन काळात सभागृहात हा प्रश्न विचारून सरकारच लक्ष वेधले.  अशाप्रकारे सर्व पातळीवर समाज बांधवासह पाठपुरावा केल्याने अखेर सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याचे आमदार पाटील यांनी म्हटलं आहे. उशिरा का होईना सरकारला शहानपण सुचलं असा टोला लगावला आहे. हे यश समाजाच्या लढयाचे असून हाच निर्णय सरकारने वेळीच घेतला असता तर आतापर्यंत पुतळा उभारणीचे कामही पूर्ण झाले असते अशीही नाराजी त्यांनी व्यक्त केली.

 
Top