धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या भव्य यशामागे पडद्यामागे अथक मेहनत करणाऱ्या मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे यांचा मोलाचा वाटा असल्याची प्रचिती त्यांच्या सत्कार सोहळ्यातून पुन्हा एकदा आली.

धाराशिव जिल्ह्याचे भाजपचे प्रमुख नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोपवलेली जबाबदारी अत्यंत निष्ठेने, कौशल्याने व यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे यांचा भाजपा कार्यालय प्रतिष्ठान भवन येथे यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मनोगत शिनगारे यांची ओळख केवळ अलीकडील निवडणुकीपुरती मर्यादित नाही. लहानपणापासूनच राज्याचे माजी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या घराण्याशी त्यांचे एकनिष्ठ, कौटुंबिक नाते राहिले आहे. शिनगारे हे कायम माजीमंत्री पद्मसिंह पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सोबत कायम सावलीसारखे उभे राहून प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पडद्यामागे राहून रणनीती आखली आहे.

ना प्रसिद्धीची हाव, ना फोटोतील झळाळी  फक्त यशस्वी नियोजन आणि निष्ठेची सेवा, हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य. या वेळच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणुकांमध्ये आमदार पाटील यांनी दिलेली जबाबदारी त्यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडली. जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्याशी त्यांचा थेट संपर्क, संघटन कौशल्य आणि स्थानिक परिस्थितीवरील भक्कम पकड यामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयाच्या दिशेने नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. प्रतिष्ठान भवन येथे झालेल्या सत्कारप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावेळी बोलताना मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे म्हणाले,“ही केवळ माझी मेहनत नाही, ही आमदार पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाची शक्ती आहे. त्यांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरणे, हेच माझे खरे समाधान आहे.“या सन्मानामुळे जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी संचारली असून, निष्ठा, परिश्रम व संघटनशक्ती यांना मिळालेली ही दाद भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


 
Top