धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याची आर्थिकदृष्ट्या मागास जिल्हा अशी ओळख आहे. जिल्ह्याची ही ओळख बदलण्यासाठी या भागाच्या आर्थिक विकासासाठी सेरेंटीका कंपनी काम करत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
सेरेंटीका कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील 40 दिव्यांगाना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सेरेंटीका रिन्यूएबल्सचे व्हाईस प्रेसीडेंट सुरजीत नारायण, कर्नल विक्रम अय्यंगार, अमित चक्रोबोर्ती आदीची उपस्थिती होती.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की, सेरेंटीका कंपनी जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनींना व्हिलचेअरचे वाटप करत आहे. तसेच जिल्ह्यातील दिव्यांगाना मदत करण्याची कंपनीची इच्छा आहे, ही मोठी गोष्ट आहे. जिल्ह्यातील विविध घटकांसाठी सेरेंटीका कंपनी काम करत आहे. युवक - युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम कंपनीच्या वतीने करण्यात येत असून हे कौशल्य प्रशिक्षण पुर्ण झालेल्या काही युवकांना नौकरी देण्याचे कामही कंपनीने केले आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनीही रोजगारक्षम व्हावे यासाठी कौशल्य प्रशिक्षण कंपनीच्या वतीने देण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सेरेंटिका कंपनीच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध समाजपयोगी कामाची दखल घेवून कंपनीच्या वतीने करण्यात येणाऱ्या या समाजपयोगी कामाचे कौतूकही जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यावेळी केले. सेरेंटीका कंपनीच्या पवनउर्जा प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांचे पवनचक्की संबंधित समस्या सोडविण्यासाठी एक मोफत हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. 1800 202 8735 हा कंपनीचा हेल्पलाईन नंबर असून याद्वारे शेतकऱ्यांना कंपनीच्या प्रतिनिधीशी थेट संवाद साधता येणार आहे.
