धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता उद्योग समूह, धाराशिव यांच्या नूतन वर्ष 2026 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन समूहाचे संस्थापक तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड-पाटील यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. या प्रसंगी औद्योगिक विकासासोबतच महिला सक्षमीकरण, कृषी व सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा समूहाचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
रुपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून सुशिक्षित युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात असून, बँकिंग क्षेत्राद्वारे महिला सक्षमीकरण तसेच सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. यासोबतच शिक्षण संस्थांसह शेतकऱ्यांसाठी अल्प दरात वेअरहाऊस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, रुपामाता डेअरीच्या माध्यमातून दुग्धव्यवसायास चालना देत जोडधंद्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.
या दिनदर्शिका प्रकाशन समारंभास रुपामाता समूहाचे कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड, रुपामाता मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, रुपामाता अर्बनचे मुख्य प्रशासकीय अधिकारी विशाल गुंड, श्री. अजय नाईक, चिफ अकाउंटंट विकास मंडाळे, नितीन मुदगल यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
