धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत 'जागतिक ग्राहक दिन' अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रति जागरूक राहावे आणि कोणत्याही फसवणुकीविरुद्ध आवाज उठवावा, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. पूनम तापडिया जिल्हा संघटक, धाराशिव उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “आजचा युवक हा उद्याचा जागरूक ग्राहक आहे. वस्तू खरेदी करताना पक्के बिल घेणे आणि गुणवत्तेची खात्री करणे ही आपली जबाबदारी आहे.“
यावेळी श्री. शरद वाडगावकर जिल्हा अध्यक्ष, ग्राहक संरक्षण परिषद यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील विविध कलमांची आणि तरतुदींची सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच श्री. रवी पीसे जिल्हा संघटक, धाराशिव यांनी ग्राहक चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. व्ही. डी. पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. डी. डी. मुंढे यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, नेपते, वाघमोडे सर आणि दिगंबर जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जागरूक ग्राहक, सुरक्षित ग्राहक“ असा निर्धार करत कार्यक्रमाची सांगता झाली.
