धाराशिव (प्रतिनिधी)-  नगरोत्थान योजनेतून मंजूर धाराशिव शहरातील रस्ते व नालीच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शहरातील रस्त्यांच्या कामांना देण्यात आलेली स्थगिती आता रद्द करण्यात आली आहे त्यामुळे 59 रस्त्यांची आणि नाल्यांची कामे आता युद्धपातळीवर सुरू होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नगरोत्थान योजनेतून शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल 117 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील 59 रस्ते व नाल्यांची कामे करण्यात येणार आहेत. निधी मंजूर झाला आता कामे सुरू झाली. तर आपली अकार्यक्षमता जनतेसमोर येईल या भीतीने जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या कामाला आडकाठी आण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. यासाठी त्यांनी अनेक हातखंडे वापरत हा विषय अनेक महिने प्रलंबित ठेवला. मात्र आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांचा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला अनुसरून सदर कामांसाठी धाराशिव नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी कार्यारंभ आदेश जारी केले होते. त्यानुसार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ देखील झाला. मात्र, पालकमंत्री यांच्या कडे काही नागरिक व जनप्रतिनिधींनी निवेदन सादर केले होते.या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या पत्राच्या आधारावर मा. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दूरध्वनीद्वारे सदर कामांना स्थगिती दिली.

त्या पत्रात सादर केलेल्या मुद्द्यांची सत्यता तपासण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 4 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. सचिवांच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेची सखोल तपासणी करण्यात आली असता, संपूर्ण प्रक्रिया नियमबद्ध व पारदर्शक रितीने पार पडल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, यावर देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविण्यात आली होती व शहरातील रस्ते कामांचा देण्यात आलेली स्थगिती रद्द झाल्याचा निर्णय चार नोव्हेंबर रोजीच झाला होता. मात्र त्या कालावधीत जिल्ह्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू होती. त्यामुळे स्थगिती रद्द होऊनही कामाला सुरुवात करता आली नाही. आता आज स्थगित रद्द झाल्याचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेली नागरिकाची हेळसांड आणि गैरसोय आता दूर होणार आहे. रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आता कोणतीही आडकाठी येणार नाही. पालिका निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी भाजपाला भरभरून कौल दिल्यानंतर लगेच ही आनंदाची वार्ता आली आहे. त्यामुळे उद्यापासून कामाला सुरुवात होणार असून औपचारिक शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत नंतर केला जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

 
Top