तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय संगीतविश्वातील लोकप्रिय अजय-अतुल या सुप्रसिद्ध संगीतकार जोडगोळीतील गायक अजय गोगावले यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे परंपरागत रीतीरिवाजांनुसार मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी देवीची ओटी भरून कुलाचार पार पाडले आणि आरती करून देवीचे आशीर्वाद घेतले. दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार माया माने यांनी अजय गोगावले यांचा देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन सन्मान केला.
यावेळी बोलताना अजय गोगावले म्हणाले,“महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी दारी गायनरूपी सेवा करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. शाकांबरी नवरात्र महोत्सवात माझ्या तारखा उपलब्ध असतील, तर त्यातील एक दिवस मी नक्कीच कार्यक्रमासाठी देण्याचा प्रयत्न करीन.”त्यांच्या या आश्वासनामुळे भक्त आणि संगीतप्रेमींमध्ये मोठा आनंद व्यक्त होत आहे. या प्रसंगी मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, रामेश्वर वाले, दिनेश निकवाडे, नवनाथ खिंडकर पुजारी सचिन अमृतराव यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
