धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न 500 खाटांचे रुग्णालय तसेच 500 खाटांचे शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही संस्थांमध्ये नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर अद्ययावत व अत्याधुनिक सोयी सुविधा विकसित करण्यासाठी अनमोल मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध असलेली अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित निदान व उपचार पद्धती, रुग्णाभिमुख पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, तसेच नियोजनबद्ध कार्यपद्धती या सर्व आदर्श बाबींची अंमलबजावणी धाराशिव येथील या दोन्ही शासकीय आरोग्य संस्थांमध्ये राबविण्याची तयारी इन्स्टिट्यूटने उत्स्फूर्तपणे दर्शवली आहे. त्यामुळे धाराशिवमधील आरोग्यसेवेची गुणवत्ता आणि दर्जा केवळ जिल्हास्तरावर न राहता राज्य व देशपातळीवरील होण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांची नागपूर येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या दोन्ही रुग्णालयांच्या इमारती, अंतर्गत रचना, उपकरणांची मांडणी, रुग्णसेवेची प्रणाली व मनुष्यबळाचे नियोजन हे सर्व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर विकसित करण्याची विनंती आमदार पाटील यांनी केली. या विनंतीला जोगळेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ते मार्गदर्शन व तांत्रिक सहकार्य देण्याची तयारी दर्शवली. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये प्रत्येक पेशंट सोबत एक आरोग्य सेवक जोडून देण्यात येतो, जो त्या रुग्णासाठी डॉक्टरांच्या वेळ घेणे, त्यासाठी आवशयक असलेल्या तपासणी व इतर अनुषंगिक बाबीसाठी मदत करतो. अगदी त्याच पद्धतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले आहे.
