धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक बी.टी. गोेेरे यांचा आर्थिक छळ करणार्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या गैरकारभाराची एसआयटी चौकशी करून शाळेवर प्रशासक नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांमार्फत (दि.18) हे निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले की, आपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयातील शिक्षक बी.टी. गोरे यांची विद्यालयाचे मुख्याध्यापक अनुचित हेतुने अडवणूक करून आर्थिक छळ करत आहेत. जुलै 2024 व जुलै 2025 अशा दोन वेतनवाढी व वरीष्ठ वेतनश्रेणीच्या लाभापासून गोरे यांना वंचित ठेवले आहे. तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयासही पत्र पाठवून दिशाभूल व फसवणूक केली आहे.
त्यामुळे शिक्षक बी.टी. गोरे यांच्या प्रलंबित दोन वेतनवाढी व वरीष्ठ वेतनश्रेणीचे लाभ द्यावेत, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाच्या गैरप्रशासनाची तातडीने एसआयटी चौकशी करून शाळेवर प्रशासक नियुक्त करावा, अन्यथा आंदोलनासारखा प्रसंग व होणार्या अप्रिय घटना टाळाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे माजी सरचिटणीस व्ही.जी. पवार, जिल्हाध्यक्ष जे.एस. शेरखाने, रमण जाधव यांची स्वाक्षरी आहे. निवेदनाची प्रत शिक्षणाधिकाऱ्यांना देखील देण्यात आली आहे.
