कळंब (प्रतिनिधी)- कळंब तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप रास्त भाव दुकानदार संघटना, कळंब यांच्या वतीने करण्यात आला आहे. संघटनेने कळंब तहसीलदार हेमंत ढोकले यांच्याकडे लेखी निवेदन दि.17 डिसेंबर 2025 रोजी दिले आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार यांचा मनमानी कारभार, आर्थिक मागणी व मानसिक त्रास दिल्याचे गंभीर आरोप संघटनेच्या निवेदनात केले आहेत.
तर निवेदनात असे ही म्हटले आहे की, तालुक्यातील काही ठरावीक गावांतील नवीन शिधापत्रिकांची फोड कोणतीही अधिकृत फाईल प्रक्रिया न करता करण्यात येत असून, अशा कार्डधारकांना तात्काळ धान्यपुरवठा सुरू केला जात आहे. मात्र मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी नियमाप्रमाणे फोड केलेल्या अनेक कार्डधारकांना आजही धान्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. धान्य सुरू करून देण्यासाठी प्रति शिधापत्रिका 2,000 रुपयांची बेकायदेशीर मागणी केली जाते. तर शिधापत्रिका फोडण्यासाठी 2 ते 3 हजार रुपयांची मागणी संबंधितांकडून करण्यात येत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. पैसे देणाऱ्यांचीच कामे केली जात असून, ठरावीक गावांतील व ठरावीक राशन दुकानदारांनाच प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप आहे.
काही राशन कार्डांना नियमबाह्य पद्धतीने थेट (प्राथमिक प्राधान्य कुटुंब) वर्गात समाविष्ट करून तात्काळ धान्य सुरू करण्यात आले असल्याचे पुरावे संघटनेने निवेदना सोबत सादर केल्याचे सांगण्यात येते. याशिवाय प्रत्येक रास्त भाव दुकान तपासणीसाठी दुकानदारांकडून 3,000 रुपयांची रक्कम घेतली जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील दोन ते तीन वर्षांपासून शासनाकडुन ऑफलाईन शिधापत्रिका देणे बंद असतानाही नायब तहसीलदार यांच्या स्वतःच्या स्वाक्षरीने शिधापत्रिका दिल्याचे प्रकार समोर आले असून, त्याच्या झेरॉक्स प्रतीही निवेदनासोबत सादर करण्यात आल्या आहेत.
या सर्व प्रकारांमुळे कळंब तालुक्यातील अनेक कार्डधारक व रास्त भाव दुकानदारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष आत्माराम बोंदर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित नायब तहसीलदार यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून तालुक्यातील सर्व कार्डधारक व दुकानदारांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने केली आहे. सदरील निवेदनाची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी धाराशिव, तसेच खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना ही देण्यात आली आहे. या निवेदनावर कळंबचे तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी काय? कार्यवाही करतात या कडे तालुक्यातील नागरीकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. सदरील निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष आत्माराम बोंदर, उपाध्यक्ष आबासाहेब मुळीक, सचिव किरण बोराडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.