धाराशिव (प्रतिनिधी)- महायुती सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांना बळ मिळत आहे. जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे हे प्रकल्प जागतिक दर्ज्याचे व्हावे व त्यांना अधिक गती मिळावी यासाठी आपल्याला व्यवस्थापन क्षेत्रात जगविख्यात असलेल्या नागपूर 'आयआयएम'चे अनमोल मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, तारा व टेक्निकल टेक्सटाईल पार्क हे तीन परिवर्तनकारी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्यासाठी मोठे सहकार्य लाभणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्याचे अर्थकारण सक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेला तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कौडगाव येथील टेक्निकल टेक्सटाईल पार्क तसेच 1000 एकर चा तारा प्रकल्प या महत्त्वाकांक्षी उपक्रमांना व्यवस्थापन क्षेत्रात नावाजलेल्या नागपूर आयआयएम या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक व संशोधन संस्थेचे मार्गदर्शन लाभणार आहे. या प्रकल्पांच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत जागतिक दर्जा, व्यावसायिक दृष्टिकोन, शाश्वत विकास व दीर्घकालीन आर्थिक परिणाम यांचा सखोल अभ्यास करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे. या अनुषंगाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नागपूर आयआयएमला भेट देऊन संस्थेच्या तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली. या भेटीत तुळजापूर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास, भाविकांसाठी मूलभूत सुविधा, पर्यटन पायाभूत सुविधा, स्थानिक व्यवसायांना संधी, तसेच नियोजित टेक्निकल टेक्सटाईल पार्कमुळे निर्माण होणारे औद्योगिक वातावरण, रोजगारनिर्मिती आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक परिणाम याबाबत सखोल विचारमंथन करण्यात आले. तारा प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकता, कौशल्यविकास आणि ग्रामीण अर्थकारण मजबूत करण्यावरही भर देण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
नागपूर आयआयएमच्या तज्ज्ञांची एक टीम येत्या जानेवारी महिन्यात धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यादरम्यान जिल्हा प्रशासन, संबंधित शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी तसेच विविध घटकांशी संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत प्रकल्पांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी, आर्थिक व्यवहार्यता, गुंतवणूक आकर्षित करण्याच्या शक्यता, सार्वजनिक-खाजगी भागीदारीचे पर्याय आणि प्रभावी व्यवस्थापन यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या तिन्ही प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थेट व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असून पर्यटन, उद्योग, सेवा क्षेत्र आणि स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल. परिणामी जिल्ह्याच्या उत्पन्नात वाढ होऊन धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
