भूम (प्रतिनिधी)- राज्य सरकारने ‘लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर युवकांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता युवकांसाठीच अडचणीची ठरत आहे. सहा महिन्यांची मुदत संपूनही सरकारकडून कोणतीही मुदतवाढ न दिल्याने भूम तालुक्यातील शिक्षण विभागासह विविध शासकीय विभागांत कार्यरत असलेले 372 युवक-युवती अचानक बेरोजगार झाले आहेत. परिणामी अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले असून युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुदतवाढ तत्काळ जाहीर न झाल्यास तालुकास्तरावर तसेच राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा युवा प्रशिक्षणार्थींनी दिला आहे. सरकारने तातडीने निर्णय घेऊन युवक-युवतींचे भवितव्य सुरक्षित करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
या योजनेअंतर्गत शिक्षणानुसार युवक-युवतींना शासकीय कार्यालयांत जबाबदारीची कामे देण्यात आली होती. अल्प मानधनावरही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या प्रशिक्षणार्थींमुळे शासनाला कमी खर्चात प्रशासन चालवणे शक्य झाले होते. मात्र सहा महिन्यांची मुदत पूर्ण होताच कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून कमी करण्यात आले. या युवा प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत त्यावरही हे प्रमाणपत्र नोकरीसाठी तसेच अनुभवासाठी उपयोगात धरले जाणार असे लेखी देण्यात आलेले आहे. मग या प्रशिक्षणार्थींना हे प्रमाणपत्र का दिले आहे असा प्रश्न भेडसावत आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना अंमलात आणली आहे. त्यानंतर पाच महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली परंतु आता वाढवून न दिल्याने या बेरोजगारांवर वाईट दिवस येऊ लागले आहेत. अगोदरच मानधन कमी त्यात वाढ करण्याऐवजी कामावरून कमी करणे म्हणजे हा युवकांचा अवमान केल्या प्रमाणे आहे. दरम्यान ही योजना अमलात आणलेले माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभेमध्ये ओरडून सांगत आहेत की कुठलीही योजना बंद केली जाणार नाही तेव्हा या योजनेचे काय होणार याकडे लाडक्या भावांचे लक्ष लागलेले आहे.