भूम (प्रतिनिधी)- अलंमप्रभू देवस्थान भूम येथील जन्मोत्सव मित्ती मार्गशिर्ष शु. पौर्णिमा रोहिणी नक्षत्रावर शहराचे आराध्य दैवत आलमप्रभू देवस्थान येथे आज सायंकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी दत्तजन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा“ या अखंड जपाने देवस्थान परिसरात भक्तिरस ओतप्रोत भरला तर गजरात नागरिकांनी फुलांची उधळण करत दत्तजन्माचा सोहळा आनंदोत्साहात पार पाडला.
आलमप्रभू यात्रेनिमित्त सकाळपासूनच शहरात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. या दरम्यान ग्रामदैवत अलमप्रभू यात्रेनिमित्त , दि.13 डिसेंबर 2025 ते दि.15 डिसेंबर 2025 रोजी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. दुपारी आलमप्रभू येथे गुरुकुल समूहाच्या वतीने फराळाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी साबुदाणा खिचडी, केळी, राजगिरा लाडू आदी उपवासाहाराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.
दत्त जयंतीनिमित्त शहरातील कसबा विभागातील श्री केशवराज मंदिरात तसेच बारबोले गल्ली येथील दत्त मंदिरात दुपारी बाराच्या सुमारास भजन, पूजाविधी आणि विविध धार्मिक उपक्रम पार पडले. पारंपरिक पद्धतीप्रमाणे शहरातील मोठ्या प्रमाणावरील नागरिकांनी उपवास पाळून दत्ताची उपासना केली.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष संजय गाढेव, विजयसिंह थोरात, बाळासाहेब क्षीरसागर, यशवंतराजे थोरात, कमिटी अध्यक्ष दिलीप शाळू, उपाध्यक्ष बाळासाहेब हुरकुडे, सचिव सुधाकर पेंटर, सदस्य शिवलिंग शेंडगे, श्रीकांत दीक्षित, हरी पवार यांच्यासह शहरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दत्तजयंतीमुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

