तुळजापूर (प्रतिनिधी)- विकसित भारतासाठी शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन ग्रामीण विकास तज्ञ, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूरचे गणेश चादरे यांनी केले. भारताचे माजी पंतप्रधान व शेतकऱ्यांचे खरे कैवारी म्हणून ओळखले जाणारे चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. याच अनुषंगाने कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने मौजे ढेकरी येथे राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त “विकसित भारतासाठी शेतकऱ्यांचे योगदान” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कोहिजनचे व्यवस्थापक डॉ. दयानंद वाघमारे, उपजिविका तज्ञ मनोहर दावणे, मनोज देवकते, ज्ञानेश्वर बनसोडे, ढेकरी सरपंच, तेजस माने, पोलिस पाटील, सोनाली मुंडे, कात्री सरपंच,मनीषा यल्लाळ, वाणेगाव सरपंच, आप्पासाहेब पाटील, सीआरपी, पल्लवी माने तसेच शेतकरी, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सोनाली मुंडे यांनी शेती क्षेत्रातील महिलांचे योगदान अधोरेखित केले. तर मनोहर दावणे यांनी कोहिजन फाउंडेशन ट्रस्टमार्फत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बनसोडे यांनी केले. कोहिजन फाउंडेशन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत, शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमास मौजे ढेकरीतील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी व संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
