धाराशिव (प्रतिनिधी)-   प्रधानमंत्री पीक विमा योजना,खरीप हंगाम 2025 अंतर्गत जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय आढावा समिती व जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती यांची संयुक्त बैठक नुकतीच संपन्न झाली.या बैठकीस संबंधित पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हास्तरीय आढावा समिती व तक्रार निवारण समितीचे सदस्य, आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व तालुकास्तरीय प्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजना,खरीप 2025 हंगामातील अंमलबजावणीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.यामध्ये पीक विमा अर्ज स्वीकृती,पात्रता व अपात्रता,विमा कंपनीकडून घेण्यात आलेले आक्षेप तसेच शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारी यावर सखोल चर्चा करण्यात आली.जिल्हास्तरीय आढावा समितीच्या बैठकीत सुकाणू समितीने यापूर्वी घेतलेल्या निर्णयांवर चर्चा करण्यात येऊन ते निर्णय जिल्हास्तरीय समितीने कायम ठेवले.

जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत विमा कंपनीकडून माहे जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत रद्द करण्यात आलेल्या एकूण 12 हजार 353 पीक विमा अर्जांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.अनेक प्रकरणांमध्ये विमा कंपनीकडून घेतलेले आक्षेप तांत्रिक व तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे असल्याचे निदर्शनास आल्याने  जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविण्यात आलेल्या सर्व अर्जांची शेतकरीनिहाय व कारणनिहाय सविस्तर माहिती संबंधित तालुकास्तरीय समितीस तात्काळ उपलब्ध करून देण्याचे,तसेच तालुकास्तरीय समितीने या अर्जांची सात दिवसांच्या आत सखोल छाननी करून अहवाल जिल्हास्तरीय समितीस सादर करण्याचे आदेश दिले.

छाननीदरम्यान विमा कंपनीकडून चुकीचे अथवा अन्यायकारक आक्षेप घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित विमा कंपनीविरुद्ध प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे आदेश जिल्हाधिकारी पूजार यांनी दिले. तसेच रद्द करण्यात आलेल्या अर्जांची त्रुटीपूर्तता करून संबंधित अर्जदारांना योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विमा कंपनीने योग्य ती कार्यवाही करण्याचेही आदेश देण्यात आले.


 
Top