तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे ते स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीकडे. नगरपंचायत अधिनियमानुसार सदस्य संख्याबळानुसार दोन स्वीकृत सदस्यांची निवड करावी लागणार असून, या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच उपनगराध्यक्ष पदाची या निवडीबाबत मोठी उत्सुकता लागली आहे 

नगरपंचायतीत एकूण 23 नगरसेवकांची निवड झाली असून, त्यामध्ये भाजपचे 18 तर काँग्रेसचे 5 नगरसेवक आहेत. संख्याबळ पाहता भाजपकडूनच दोन्ही स्वीकृत सदस्य निवडले जाण्याची शक्यता प्रबळ आहे. त्यामुळे भाजपअंतर्गत इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यासह सर्व नगरसेवक सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. त्यानंतर लगेचच स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांमध्ये हालचाल वाढली असून, पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


गटनेतेपदासाठीही उत्सुकता

स्वीकृत सदस्यांबरोबरच आता सभागृहातील गटनेतेपदाच्या निवडीकडेही लक्ष लागले आहे. भाजपकडून अनुभवी नगरसेवक पंडित जगदाळे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, काँग्रेसकडून अमोल यांना गटनेतेपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सत्ता भाजपकडे  जबाबदारीही मोठी

नगरपंचायतीची सत्ता भाजपच्या ताब्यात आल्याने उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीची जबाबदारीही भाजपवर आहे. या निवडीदरम्यान पक्षनेते कोणाला प्राधान्य देतात, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.स्वीकृत सदस्य व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत आमदार राणा जगजीतसिंह पाटील तसेच नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने, ते कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


शहरात राजकीय चर्चांना उधाण

स्वीकृत सदस्य पदासाठी कोणाची निवड होणार, कोणाची संधी हुकणार आणि गटनेतेपदावर कोण विराजमान होणार, याबाबत तुळजापूरमध्ये सध्या जोरदार चर्चा रंगली असून, येत्या काही दिवसांत या साऱ्या घडामोडींवर शिक्कामोर्तब होणार आहे. 


 
Top