तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्रोत्सवास रविवारी दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता श्रीगणेश ओवरीत शाकंभरी देवी प्रतिमेसमोर घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. हा महोत्सव जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या नवरात्रोत्सवास तुळजापूरकर छोटा दसरा म्हणून साजरा करतात.
शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त मार्गशिर्ष अमावस्या दिनी शनिवारी (दि. 20) निद्रीस्त करण्यात आलेली श्री तुळजाभवानी मातेची मुळमुर्ती पौष शुध्द दुर्गाष्टमी दिनी रविवारी (दि. 28) पहाटे मुख्य गर्भगृहातील सिंहासनावर अधिष्ठीत करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. या महोत्सवाची सांगता 3 जानेवारी 2026 रोजी शाकंभरी पोर्णिमा दिनी घटोत्थापनेने (घट उठवणे) होणार आहे. हा शाकंभरी नवरात्र महोत्सव पौष महिन्यात असल्याने या महिन्यात भाविकांची संख्या रोडावलेली असते. त्यामुळे या कालावधीत स्थानिक पुजारीवृंद देविजीस सिंहासन महाअभिषेक पुजा, कुलधर्मकुलाचार करतात. तसेच शारदीय नवरात्रोत्सव प्रमाणेच या कालावधीत नऊ दिवस उपवास करतात. या शाकंभरी नवरात्रोत्सव श्रीगणेश ओवरीत शाकंभरी देवी प्रतिमेसमोर काळात सर्व धार्मिक विधी महापुजा शारदीय विधीवत घटस्थापना करण्यात आल्यानंतर या नवरात्रोत्सवाप्रमाणेच असतात. या यात्रेतील प्रमुख जल यात्रेचा धार्मिक सोहळा 31 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.