धाराशिव (प्रतिनिधी)- स्त्री मुक्ती दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून सामाजिक, राजकीय आणि मानसिक गुलामगिरीविरोधातील संघर्षाचा दिवस आहे, असे ठाम प्रतिपादन करत वंचित बहुजन महिला आघाडी, धाराशिव यांच्या वतीने स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात कुटुंबाचा गाडा हाकत सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या महिलांचा डॉ. यशवंत मनोहर लिखित “डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली” हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानातून महिलांच्या कार्याचा गौरव तर करण्यात आलाच, शिवाय आजही समाजात रुजलेल्या मनुवादी मानसिकतेवर थेट प्रहार करण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आयु. शिलाताई चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई अंबुरे, उषाताई पवार, विजयश्री कुंडगीर यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे नेतृत्व वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुराधाताई लोखंडे यांनी केले. तर जिल्हा महासचिव रुक्मिणी बनसोडे, लक्ष्मीताई गायकवाड, सुरेखाताई गंगावणे, लोचनाताई भालेराव, सुजाताताई बनसोडे, खुणेताई आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, पण तिची मानसिकता अजूनही समाज, प्रशासन आणि राजकारणात जिवंत आहे. स्त्रीमुक्ती फक्त भाषणांपुरती न राहता निर्णय प्रक्रियेत महिलांना समान अधिकार दिले गेले पाहिजेत.”
याप्रसंगी फुलेआंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, उपाध्यक्ष भाऊसाहेब अणदुरकर, धाराशिव शहराध्यक्ष नामदेव वाघमारे, शेखर बनसोडे, आकाश भालेराव, महादेव एडके, अंबूरे सर यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्री सन्मानापुरता नव्हे तर स्त्री सक्षमीकरणासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.