धाराशिव  (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान मिळवण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांनी अनेक भाषा आत्मसात करण्यासह सर्व धर्मांचे धर्मग्रंथ अगदी बारकाईने अभ्यासले काढले. त्यांनी सातत्याने विद्यार्थी बनून सर्वांगीण अभ्यास व लेखन केले. त्यांच्या लेखनामध्ये प्रचंड मोठी ताकद होती. त्या लेखणीच्या बळावरच त्यांनी भारतातील आदिवासी, वंचित, गरीब, श्रीमंत तसेच महिला या सर्वांना एकच न्याय देण्याचे महत्त्वाचे काम केले असल्याचे प्रतिपादन तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मुकुंद गायकवाड यांनी दि.६ डिसेंबर रोजी केले.

धाराशिव शहरातील माता रमाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मुप्टा शिक्षक संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बशारत अहमद तर प्रमुख पाहुणे म्हणून भाई धनंजय पाटील, बीड येथील नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, दादासाहेब जेटीथोर, पृथ्वीराज चिलवंत, मारोती पवार, पंडित कांबळे, प्रा राम चंदनशिवे, प्रा.महेंद्र चंदनशिवे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्राचार्य डॉ गायकवाड म्हणाले की, भारत ही संतांची भूमी असल्यामुळे सर्व जाती पंथांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विशेष म्हणजे संतामुळेच संस्कार मिळतात. तसेच ज्ञान सर्वात जास्त आवश्यक असून ज्ञानामुळे मान-अपमान सहन करण्याची ताकद मिळते. जो व्यक्ती वेळेचा गुलाम होतो, तोच पुढे जातो असे त्यांनी सांगितले. तर अमेरिकेचे संविधान फक्त ७ कलमांचे असून ते लिहिण्यासाठी ४ महिने लागले. ऑस्ट्रेलियाचे संविधान १५३ कलमांचे असून ती लिहिण्यासाठी ९ वर्षे लागली. तर भारताच्या संविधानात ३९५ कलमे असून ते लिहीण्यास २ वर्ष ११ महिने १७ दिवस लागले. संविधान लिहिणे माबुली बाब नसून ज्ञानाशिवाय पर्याय नाही असे सांगत ते म्हणाले की, संविधान लिहिताना डॉ. आंबेडकर यांनी १८-१८ तास अभ्यास करून अतिशय अपार कष्ट व मेहनत घेतली आहे.  त्यामुळे भारताचे संविधान अतिशय मजबूत व सर्वांना न्याय देणारे आहे. उलट अमेरिकेची लोकसंख्या ३५ कोटी असून भारताची तिप्पट आहे. मात्र, अमेरिका आज अस्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय कामगार मंत्री असताना खदानीत काम करणाऱ्या कामगार बरोबर जाऊन चर्चा करीत होते. त्यामुळेच त्यांनी कामगारांचा देखील विचार करून त्यांच्या भवितव्याची तरतूद संविधानामध्ये कायद्याच्या चौकटीत बसविली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तर डॉ बशारत अहमद म्हणाले की, अजूनही जुन्या रूढी परंपरा सुटलेल्या नाही. १९७७ मध्ये उस्मानाबादमध्ये पहिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक संपूर्ण शहरातून काढली. त्यावेळी प्रबोधनात्मक मिरवणूक होत होती आता त्या मिरवणुकीचे स्वरूप बदलले असून डीजे व नशेमध्ये धुंद असलेल्या तरुणांचा मोठा समावेश असल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे डॉ आंबेडकर यांनी धर्मांतर केल्यानंतर प्रबोधन करण्यासाठी त्यांना फक्त दोनच महिने मिळाला. ते जर आणखी २ वर्ष जगले असते तर सर्व समाजाचा बौद्ध धर्म झाला असता असे त्यांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात हनुमंत उपरे, लक्ष्मण माने, प्रा मच्छिंद्र सकटे यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. तर आता विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे हे देखील तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म हा भारतातलाच म्हणजे आपला असल्याचे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ आंबेडकर यांची जयंती व महापरिनिर्वाण दिन प्रबोधनाचे कार्यक्रम सादर करून करावेत असे सांगत २२ प्रतिज्ञांचे पठण सकाळ व संध्याकाळी करावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रा. रोडे म्हणाले की, विद्यार्थी व महिलांना जागृत करण्याचे काम करावे. परिवर्तन करणे गरजेचे असून मुलांना सुशिक्षित करावे जयंती करताना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.रवी सुरवसे यांनी तर सूत्रसंचालन बाबासाहेब मनोहर यांनी व उपस्थितांचे आभार व्ही.एस. गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा.महेंद्र चंदनशिवे, ॲड.अनुरथ नागटिळक, दिपक कांबळे डॉ.कांबळे, ॲड अजित कांबळे, अमोल गडबडे, प्रा.बलभीम कांबळे, मिलिंद जानराव, विजयकुमार दणाणे, राजेंद्र अंगरखे, विकास काकडे, चंद्रकांत मस्के, हनुमंत गायकवाड, तुपारे, बलभीम कांबळे, बाळासाहेब माने आदींसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top