मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने मानवी हक्क दिनानिमित्त लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा या विषयावर दोन दिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन दिनांक 10 आणि 11 डिसेंबर रोजी करण्यात आले. कशाच्या दृष्टीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते.
कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी कायद्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थिनींसमोर मांडली. त्यांनी स्पष्ट केले की लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013 हा कायदा कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, आदरयुक्त आणि भेदभावमुक्त वातावरण मिळावे या उद्देशाने लागू करण्यात आला आहे. पुढे बोलताना डॉ. अस्वले म्हणाले की,या कायद्यानुसार प्रत्येक संस्थेत तक्रार समिती असणे बंधनकारक आहे. तसेच तक्रार दाखल झाल्यानंतर 90 दिवसांत चौकशी पूर्ण करणे हे कायद्याचे निर्देश आहेत. विद्यार्थिनींनी कोणताही प्रसंग घडल्यास निर्भयपणे तक्रार करावी, असा आत्मविश्वास निर्माण करणे ही शिक्षण संस्थांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
यावेळी विद्यार्थिनींकडून लैंगिक संवेदनशीलता विषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. बालिका गायकवाड आणि डॉ. आशा शिंदे यांनी विशाखा समितीची मार्गदर्शक तत्त्वे, तक्रारपेटी समिती, महिला, विद्यार्थिनींना भेडसावणारे मानसिक व सामाजिक प्रश्न या विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रसंगी महिला सक्षमीकरण कक्षाच्या समन्वयिका प्रा. रेश्मा नितनवरे, डॉ. मनोरंजना निर्मळे, डॉ. पार्वती सावंत, प्रा. आरती जाधव, प्रा. सपना राठोड, प्रा. मयुरी माडजे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितनवरे आर. आर. यांनी केले. प्रास्ताविक डॉ. पार्वती सावंत तर आभारप्रदर्शन डॉ. मनोरंजना निर्मळे यांनी केले. महाविद्यालयातील या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये कायदेशीर जागरूकता, सुरक्षितता आणि आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होईल असे मत विद्यार्थिनींकडून व्यक्त करण्यात आले.
