धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दिनांक 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर शहरात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्वनियोजित 3 डिसेंबर रोजीची मतमोजणी आता 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पडल्याने आता सर्वांचे लक्ष मतमोजणीच्या दिवशी कोणाचा गुलाल उधळला जाणार याकडे लागले आहे. नगरपरिषदेतील 38 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाचे भवितव्य मतपेट्यांमध्ये कैद झाले असून तीन सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. या तीन जागांसाठी मतदान 20 डिसेंबर रोजी होणार आहे.

2 डिसेंबर रोजी वापरलेली सर्व ईव्हीएम मशीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. स्ट्राँग रूमला पोलिसांचा अतिशय कडेकोट पहारा असून कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासन दक्ष आहे. स्ट्राँग रूमच्या चारही बाजूंनी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या 24 तास पहारा देत आहेत. यामध्ये 17 कर्मचारी व तीन अधिकारी तैनात असून परिसरात दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे अखंडित देखरेख केली जात आहे.


स्ट्राँग रूमला अधिकाऱ्यांच्या भेटी

संपूर्ण सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे हे दिवसभरातून तीन ते चार वेळा स्ट्राँग रूमला भेट देत असून सुरक्षा उपायांची तपासणी करत आहेत. मतदान झाल्यानंतर काही पक्षांच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूमची पाहणी केली. 


 
Top