तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव तसेच नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री तुळजाभवानी  मंदिर संस्थान यांनी दर्शन व्यवस्थेत विशेष बदल जाहीर केले आहेत. ते पुढील प्रमाणे  पहाटे 1 वाजता चरणतीर्थ, त्यानंतर दर्शन मंदिर संस्थानच्या निर्णयानुसार बुधवार दि. 24 डिसेंबर 2025 ते शनिवार दि. 4 जानेवारी 2026 या कालावधीत रोज पहाटे 1.00 वाजता चरणतीर्थ होऊन लगेचच धर्मदर्शनास प्रारंभ केला जाणार आहे. भाविकांनी या वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दि. 28 डिसेंबर 2025 पासून श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. या काळात दररोज हजारो भाविक तुळजापुरात दाखल होतात. यंदा नाताळ सुट्ट्यांची जोड लागल्याने गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दि. 24 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत सकाळच्या पूजांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

या काळात चरणतीर्थ  पहाटे 1:00 वाजता, सकाळची अभिषेक  पूजा (घाट)  सकाळी 6:00 वाजता असे वेळापत्रक राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन माया माने, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी केले आहे. शाकंभरी नवरात्र आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानकडून दर्शन, रांग व्यवस्था, सुरक्षा आणि सुविधा याबाबत विशेष तयारी करण्यात येत असून भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन मिळावे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.

 
Top