धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाही अधिक मजबूत व पारदर्शक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून नवीन SIR (Special Intensive Revision) विधेयक व निवडणूक सुधारणा (Election Reforms) यासंदर्भात भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय, धाराशिव येथे सविस्तर बैठक पार पडली.
या बैठकीत मतदारयादीत पात्र नागरिकांचे नाव समाविष्ट करणे, मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नावे वगळणे तसेच घुसखोर/अपात्र नागरिकांचे मतदान अधिकार रद्द करून त्यांची नावे मतदारयादीतून काढून टाकणे या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक व विश्वासार्ह कशी करता येईल, यावर मार्गदर्शन करताना मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, पात्र मतदारांची योग्य नोंदणी करणे आणि अपात्र मतदारांना यादीतून वगळणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची पडताळणी करण्यात येते. यासाठी नागरिकांना ऑनलाईन (ECINET App) तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असून, कोणत्याही पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क नाकारला जाऊ नये आणि मतदार यादीत कोणतीही अपात्र व्यक्ती राहू नये, याबाबत उपस्थित कार्यकर्त्यांना सविस्तर व योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस मल्हार पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी,नूतन नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे, शहराध्यक्ष अमित शिंदे, नेताजी आबा पाटील, सुनील काकडे, राहुल काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, दत्ता बंडगर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
