धाराशिव (प्रतिनिधी)- राज्याचे आरोग्य सेवा संचालक,डॉ. नितीन अंबाडेकर यांनी आज 22 डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, येडशी अंतर्गत येणाऱ्या आळणी (ता. धाराशिव) येथील आरोग्य उपकेंद्रास सदिच्छा भेट देऊन तेथील आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.या भेटीदरम्यान त्यांनी उपकेंद्रातील कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.

डॉ.अंबाडेकर यांनी उपकेंद्राच्या इमारतीची पाहणी करताना प्रसूती कक्ष,लसीकरण विभाग तसेच औषध साठवणूक कक्षाची सविस्तर तपासणी केली.केंद्रात येणाऱ्या रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळत आहेत का,आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचाराची व्यवस्था कशी आहे,तसेच संदर्भ सेवा कोणत्या पद्धतीने दिली जाते,याची माहिती त्यांनी उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घेतली.

यावेळी आळणी येथील आरोग्य सेविका,आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविकांशी संवाद साधताना डॉ. अंबाडेकर म्हणाले की,ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात आरोग्य उपकेंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.माता व बाल आरोग्य सर्वेक्षणात कोणतीही कसर राहू नये,असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच ‌‘आरोग्यवर्धिनी केंद्रा'च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या असंसर्गजन्य रोग (रक्तदाब,मधुमेह) तपासणी मोहिमेचाही त्यांनी आढावा घेतला.

या भेटीदरम्यान त्यांनी लसीकरण मोहिमेअंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी.गरोदर महिलांची नियमित तपासणी व उपचार करावेत. उपकेंद्र परिसर स्वच्छ व निर्जंतुक ठेवावा तसेच रुग्णांच्या अभिलेख (रेकॉर्ड) व औषध साठा अद्ययावत ठेवावा,अशा महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या. या पाहणी दौऱ्यावेळी आरोग्य उपसंचालक (लातूर परिमंडळ) डॉ. रेखा गायकवाड,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फुलारी तसेच तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आळणी येथील ग्रामस्थांनीही आरोग्य संचालकांशी संवाद साधून आपल्या परिसरातील आरोग्य सुविधांबाबत चर्चा केली.


 
Top