धाराशिव (प्रतिनिधी)- हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांचा उर्जा साजरा करण्याचे हे 721 वे वर्ष आहे. या उर्समध्ये हिंदू मुस्लिमसह सर्व धर्मांचे भाविक विविध राज्यातून मोठ्या संख्येने ऊर्स साजरा करण्यासाठी एकत्र येतात.हा उर्स एक एकात्मतेचे प्रतीक आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऊर्स सर्वांच्या सहकार्याने व उत्साहाने साजरा करावा.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ऊर्स पूर्वतयारीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी पुजार बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत,अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त प्रदीप कुटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा बांगर, मुख्याधिकारी अंधारे, तहसीलदार मृणाल जाधव,जिल्हा वक्फ अधिकारी आमेर, एसटी आगारप्रमुख बालाजी भांगे, महावितरणचे पी.वाय.निकम यांचेसह उर्स आयोजन समितीचे ॲड.काझी परवेझ अहमद, इरफान कुरेशी, मोईनुद्दीन पठाण व फिरोज पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पुजार म्हणाले की, नगरपरिषदेने ऊर्सच्या परिसरात स्वच्छता कायम ठेवावी. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. अग्निशमन व्यवस्था या काळात कायम तैनात ठेवावी.वीज भारनियमन या काळात करू नये. असे सांगितले.
खोखर म्हणाल्या की, संदल मिरवणुकीत डीजेचा वापर होणार नाही.वापर करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल.संदल मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. कोणताही अनुचित प्रकार उर्स दरम्यान होऊ नये यासाठी येणे-जाण्याचा मार्ग प्रशस्त असावा. वाहतूक विस्कळीत होणार नाही यासाठी पोलीस काम करतील. डॉ.बांगर यांचेही यावेळी मार्गदर्शन झाले.
