धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित असलेल्या 500 खाटांच्या अत्याधुनिक नवीन जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीस गती मिळाली आहे. आरोग्य सेवा संचालक, मुंबई डॉ.नितीन अंबाडेकर यांनी जिल्ह्याला भेट देऊन नवीन रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेची सविस्तर पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रस्तावित इमारतीचा नकाशा, विविध विभागांची रचना तसेच वॉर्डनिहाय नियोजनाचा सखोल आढावा घेतला.
भविष्यातील वाढत्या आरोग्य गरजांचा विचार करून नियोजन करण्यात येत असून,नवीन रुग्णालय इमारतीमध्ये सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.पाहणीदरम्यान डॉ.अंबाडेकर यांनी रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी,जागेची उपयुक्तता तसेच भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण सूचना केल्या.जिल्ह्यातील रुग्णांना एकाच छताखाली सर्व उपचार सुविधा मिळाव्यात तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा समावेश करण्यात यावा, यावर त्यांनी विशेष भर दिला. या आढावा बैठकीस उपसंचालक आरोग्य सेवा (लातूर परिमंडळ) डॉ. रेखा गायकवाड,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, तसेच आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.
जागेचा घेतला आढावा
संचालकांनी जागेची उपयुक्तता, रुग्णांच्या दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर स्थान आणि भविष्यातील विस्तारासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याबाबत निरीक्षण नोंदविले. तसेच नवीन इमारतीच्या नकाशा (फ्लोअर प्लॅन) तपासणीदरम्यान बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया गृह, प्रशासकीय कक्ष यांचे योग्य नियोजन करण्याबाबत तांत्रिक सूचना दिल्या. रुग्णालयामध्ये औषधवैद्यकशास्त्र, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंग तसेच इतर विशेष विभागांसाठी आवश्यक खाटांची संख्या,वॉर्डनिहाय पायाभूत सुविधा,वीज व पाणीपुरवठा तसेच सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्था सक्षम करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच रुग्णालयाची इमारत ‘रुग्णस्नेही' असावी,नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहील अशा पद्धतीने खिडक्यांची रचना करावी, आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांची ने-आण सुलभ व्हावी यासाठी रॅम्प व लिफ्टची पुरेशी व्यवस्था करावी आणि बांधकाम सुरू करण्यापूर्वी सर्व तांत्रिक व प्रशासकीय मान्यतांची तातडीने पूर्तता करावी,अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.