तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आज घटस्थापनेने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. दुपारी  12 वाजता मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना करण्यात आली आणि सात दिवस चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली.

या प्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, उपाध्ये सुनीत पाठक, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमराराजे कदम, अनंत कोंडो, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक धार्मिक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्रोच्चार, विधी आणि भक्तीभावाने संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता.

श्री तुळजाभवानी देवींचे दरवर्षी दोन प्रमुख उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सव व पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्र उत्सवाचा समावेश आहे. शाकंभरी नवरात्र उत्सवाला तुळजापुरात ‌‘धाकटा दसरा‌’ असेही म्हटले जाते. तत्पूर्वी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली श्री तुळजाभवानी देवींची मंचकी निद्रा संपवून आज पहाटे पौष शुक्ल अष्टमीच्या शुभमुहूर्तावर देवींची सिंहासनावर विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सात दिवस चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता 3 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेला दुपारी 12 वाजता पूर्णाहुती व त्यानंतर घटोत्थापनाने होणार आहे.

या नवरात्र काळात श्री तुळजाभवानी देवींची 29 डिसेंबर रोजी रथ अलंकार महापूजा, 30 डिसेंबर रोजी मुरली अलंकार महापूजा, 31 डिसेंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा तसेच, सकाळी 7 वाजता जलयात्रा, 1 जानेवारी रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा व  2 जानेवारी रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा संपन्न होणार आहे. तसेच शाकंभरी नवरात्र काळात दररोज रात्री श्री तुळजाभवानी देवींचा छबीना निघणार आहे. संपूर्ण तुळजापूर नगरी भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणाने भारावून गेली आहे.



महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आज रविवार, पौष शुक्ल अष्टमीला धार्मिक उत्साह व भक्तिभावाच्या वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे मंदिरात पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. 

 
Top