तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी मंगळवारी दि. 23 डिसेंबर रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास जशोदाबेन यांनी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने सकाळपर्यंत याची कुणालाही चाहूल लागली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, जशोदाबेन मंगळवारी रात्री साधारण बारा वाजता थेट श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर मंदिर प्रशासनाच्या समन्वयाने त्यांना मंदिरात नेण्यात आले. पहाटे चरणतीर्थ झाल्यानंतर त्यांनी देवीची विधिवत पूजा करून मनोभावे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईक उपस्थित होते. कोणताही गाजावाजा न करता, अत्यंत साधेपणाने हा धार्मिक सोहळा पार पडला. दर्शनानंतर त्या तात्काळ परतल्या, त्यामुळे भाविकांनाही त्यांच्या उपस्थितीची फारशी कल्पना आली नाही.  महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी व सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाकडून पूर्ण गुप्तता पाळण्यात आल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे पहाटेच्या शांत वातावरणात घडलेल्या या दौऱ्याची चर्चा मात्र दिवसभर तुळजापूरात रंगली होती.

 
Top