धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 28 डिसेंबर 2025 रोजी अहमदिया मुस्लिम जमाअतची युवक शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया उस्मानाबाद यांच्या वतीने वकार-ए-अमल विभाग (श्रमाची प्रतिष्ठा) अंतर्गत शहरातील खिरणी मळारासोलपुरा परिसरात स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आला.

मोहम्मदिया मशिद ते अहमदिया मशिद रस्त्यादरम्यान असलेली जुनी नाली पूर्णतः खराब झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरत होते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अस्वच्छता व आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन अहमदिया मुस्लिम युवक संघाच्या युवकांनी पुढाकार घेत जुनी नाली साफ करण्यासोबतच नवीन नाली खोदण्याचे कामही केले, ज्यामुळे सांडपाण्याचा योग्य निचरा होऊन परिसर स्वच्छ करण्यात आला.

या श्रमप्रतिष्ठा उपक्रमात युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थी, अभियंते, शिक्षक, फार्मासिस्ट तसेच इतर विविध पेशांतील नागरिकांनी कोणताही संकोच न ठेवता स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून मानवसेवेचा आदर्श निर्माण केला. या उपक्रमाच्या माध्यमातून परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर नागरिकांची स्वतःचीही जबाबदारी आहे, असा महत्त्वाचा संदेश उपस्थित नागरिकांना देण्यात आला. या कार्यक्रमात ख़ुद्दाम-उल-अहमदिया जिल्हाध्यक्ष राग़ेब अलीम, शहराध्यक्ष नदीम अहमद, अहमदिया मुस्लिम जमाअत अध्यक्ष अब्दुस समद, चिटणीस (वक़ार-ए-अमल) आदिल अहमद तसेच अब्दुल अलीम,अब्दुल नईम, मामून अहमद, मुताहिर अहमद, सजील अहमद, तौसीफ अहमद, शफीक अहमद व इतर सदस्य सहभागी झाले होते.

 
Top