धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही बोगस डॉक्टरांनी अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय सुरू केला असून,अशा बोगस डॉक्टरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.तसेच भविष्यात कोणीही अशा प्रकारचा व्यवसाय करण्याचे धाडस करणार नाही,असा कायमस्वरूपी धडा शिकवण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलावीत,असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी तथा अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक (बोगस डॉक्टर) शोधन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकत्याच आयोजित अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक (बोगस डॉक्टर) शोधन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक तथा समिती सदस्य डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,उपजिल्हा पोलीस अधीक्षक तथा समिती सदस्य सचिव,पथक प्रमुख,तालुका आरोग्य अधिकारी (ग्रामीण), वैद्यकीय अधीक्षक (ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय) तसेच गट विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास यांनी सांगितले की, आजपर्यंत जिल्ह्यात अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या 69 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी 17 व्यावसायिकांवर विविध पोलीस ठाण्यांत तपास सुरू आहे, तर 36 प्रकरणे न्यायप्रलंबित आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात तालुकानिहाय ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची संख्या धाराशिव 194, तुळजापूर 52,लोहारा 27,उमरगा 54,कळंब 51,भूम 39,वाशी 15 व परंडा 44 अशा प्रकारे जिल्ह्यातील 8 तालुक्यांतील ग्रामीण भागात एकूण 476 डॉक्टर कार्यरत आहेत.
