धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील केशेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरू असलेल्या अर्थात नॅशनल क्वालिटी ॲश्युरन्स स्टँडर्ड मानांकन तपासणीसाठी नागपूरहून डॉक्टरांचे एक पथक जिल्ह्यात आले होते.या पथकात नागपूर येथील उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत कापसे तसेच कोल्हापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील करुंदवाडे यांचा समावेश होता.
आरोग्य विभागाचा कारभार अधिक सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘कायकल्प' तसेच ‘एनक्यूएएस अशा विविध तपासण्या केल्या जातात.मात्र,जिल्ह्यातील केशेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने चक्क ‘ट्रॅक्टर'मधून नागपूरला प्रवास केल्याचे बिल सादर केल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या संदर्भात सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चौकशी केली असता कोणताही वैद्यकीय अधिकारी अथवा अधिकारी शासकीय संस्थेच्या तपासणीसाठी भेट देत असताना खाजगी वाहनाचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले.त्यानुसार संबंधित पथकासाठी खाजगी वाहनाचा वापर करण्यात आला होता.प्राथमिक आरोग्य केंद्र,केशेगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आलेले खाजगी वाहनाचे बिल तपासणीअंती योग्य व बरोबर असल्याचे आढळून आले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, केशेगाव येथे आलेल्या पथकाने अर्थात नॅशनल क्वालिटी ॲश्युरन्स स्टँडर्ड मानांकन तपासणी केली असून, एनक्यूएएस मानांकनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र,केशेगावची निवड करण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी दिली आहे.