धाराशिव (प्रतिनिधी)-  बनावट वैद्यकीय पदवी लावून उपचार करणाऱ्या तोतया डॉक्टरचा भांडाफोड झाला असून बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चार दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले असताना बोगस डॉक्टरचे हे प्रकरण समोर आले आहे.

यासंबधी सविस्तर वृत्त असे की, सुधीर मुरलीधरराव झिंगाडे (रा. बेंबळी, ता. जि. धाराशिव) या व्यक्तीने बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचे वैध प्रमाणपत्र नसताना तसेच डी.एम.एस. ही पदवी असतानाही तो एमबीबीएस असल्याचा बनाव करून वैद्यकीय व्यवसाय केल्याचा आरोप आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दिनांक 1 जून 2025 रोजी बेंबळी येथे आरोपीने बनावट वैद्यकीय प्रिस्क्रीप्शन तयार करून त्यावर एमबीबीएस पदवीचा उल्लेख केला. त्या आधारे त्याने आकाश गोरोबा चव्हाण (रा. रुईभर) यांच्यावर निष्काळजीपणे व हयगयीने चुकीचे उपचार केले.

या उपचारांमुळे संबंधित रुग्णास गंभीर दुखापत होऊन त्याच्या आरोग्यास धोका निर्माण झाला, असे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. आरोपीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक कायदेशीर परवाने व नोंदणी नसतानाही त्याने वैद्यकीय सेवा पुरवून फसवणूक केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी डॉ. विशाल सखाराम पवार (वय 26, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबळी, रा. पवार निवास, धाराशिव रोड, तुळजापूर) यांनी दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(3), 336(3), 340(2), 125 (अ)(ब) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 3 व 6 आणि महाराष्ट्र नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 
Top