धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतची मुदत जानेवारी 2026 मध्ये संपणार असून, गाव खेड्यातील पुढाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 428 ग्रामपंचायतीसाठी जानेवारी 2021 मध्ये पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या होत्या.

त्याची मुदत एक महिन्यांनी म्हणजे जानेवारी 2026 मध्ये संपणार आहे. परंतु नगरपालिकेची मतमोजणी लांबल्यामुळे तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे ग्रामपंचायत निवडणुका घेण्यास सध्या पुरेसा वेळ नाही. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 428 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार ते पाच महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या या निवडणुका आता थेट एप्रिल मे 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीवर लक्ष ठेवून बसलेल्या गाव पुढाऱ्यांची निराशा झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका 2026 मध्ये पार पडणार असल्यामुळे प्रशासनाने चार महिन्यापूर्वी ग्रामपंचायतींची सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर केली आहे. त्यानंतर गाव पातळीवर गाव पुढाऱ्यांकडून निवडणुकांची तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात येईल या अपेक्षेने गाव पुढाऱ्यांनी तयारी सुरू केली होती. मात्र, नगरपालिका निवडणुकांची लांबलेली मतमोजणी, आगामी काळात महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुका यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा हा कार्यक्रम आता जानेवारी ऐवजी थेट एप्रिल  मे महिन्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जानेवारीनंतर जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकराज येण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

जानेवारी 2021 मध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या त्यांची मुदत जानेवारी 2026 मध्ये संपणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्याच कालावधीत नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी करण्यात आलेली नाही.

पुढील पंधरा दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढील दीड महिन्यात पार पडतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 31 जानेवारी 2026 च्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक केलेले आहे.

त्यामुळे 31 जानेवारी पूर्वी सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून प्राधान्याने घेतल्या जातील. सध्या संपूर्ण प्रशासन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याच्या कामात व्यस्त आहे. 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण प्रशासन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामांमध्ये व्यस्त राहण्याची शक्यता जास्त आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम तयार करण्यास सध्या प्रशासनाकडे वेळ नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाला साधारण दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका पार पडल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम तयार होऊ शकतो आणि त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात या निवडणुका होऊ शकतात.

यावर्षी ऐन उन्हाळ्यातच गाव खेड्यातील राजकारण ग्रामपंचायतच्या निवडणुकांमुळे तापणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नेमले जाणार आहेत. 2021 मध्ये झालेल्या निवडणुकांच्या पूर्वीदेखील तीन ते चार महिने याच 428 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले होते.


तालुकानिहाय निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या

तालुका  ग्रामपंचायत संख्या

धाराशिव  66

तुळजापुर  53

उमरगा  49

लोहारा  26

कळंब  59

वाशी  34

भूम  71

परंडा  70

एकूण  428

 
Top