मुरुम (प्रतिनिधी)- मुरुम नगरपरिषदेच्या राजकारणात गेल्या 50 वर्षांपासून कै. माधवराव पाटील यांच्या वारसा जपत एकहाती सत्ता अबाधित राखत, जनमानसावर अधिराज्य गाजवणारे धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा नगराध्यक्ष पदी विराजमान झालेले लोकनेते, बापूराव पाटील यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. 'बसवरत्न पुरस्कार सोहळ्याचे' मुख्य आधारस्तंभ बापूराव पाटील यांचा 'बसवरत्न पुरस्कार नियोजन समिती, धाराशिव' यांच्या वतीने करण्यात आला
मुरुम शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन गेली पाच दशके सातत्याने सत्तेवर राहणे ही एक साधी गोष्ट नसून, ती पाटील परिवाराच्या जनसामान्यांशी असलेल्या घट्ट नात्याची पावती आहे. लोकशाहीत लोकांचे प्रेम टिकवून ठेवणे कठीण असते, परंतु कै. माधवराव पाटील यांच्या नंतर बसवराज पाटील, बापूराव पाटील व युवा नेतृत्व शरण पाटील यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि दूरदृष्टीने मुरुम नगरपरिषदेवर आपली पकड कायम मजबूत ठेवली आहे. 50 वर्षांच्या या राजकीय प्रवासात अनेक लाटा आल्या आणि गेल्या, पण पाटील यांचे नेतृत्व एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अढळ राहिले आहे, हेच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे.
पाटील परिवाराच्या या अभूतपूर्व यशाचे मुख्य सूत्र म्हणजे त्यांनी कधीही जाती-धर्माचे राजकारण केले नाही. “सर्व जाती-धर्माला सन्मानपूर्वक न्याय“ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून त्यांनी समाजकारण केले. मुरुममधील प्रत्येक घटकाला, मग तो कोणत्याही समाजाचा असो, पाटील परिवाराने नेहमीच आपले मानले आहे. याच सर्वसमावेशक वृत्तीचे फलित म्हणजे आज 50 वर्षांनंतरही नगरपरिषदेची सत्ता त्यांच्याकडे अबाधित आहे. जनतेचा हा विश्वास संपादन करणे हेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठे यश आहे. यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, युवा नेते शरणजी पाटील यांच्यासह बसवरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष सन्नी पाटील,बालाजी पाटील, धनराज धुम्मा, करण पाटील, संगमेश्वर वारद, जगदीश वरकले आदीनी बापूराव पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बापूराव पाटील नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्यामुळे मुरुम शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, तो असाच पुढे चालू राहील. पाटील साहेबांचे हे नेतृत्व आणि 50 वर्षांची ही यशस्वी कारकीर्द भावी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
