धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दळणवळणाच्या मूलभूत सुविधांचा दर्जेदार लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील शेत आणि पाणंद रस्ते मिशन मोडवर पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात येत्या जानेवारी महिन्यापासून युद्धपातळीवर सुरू होणार असून, यासाठी मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यात मिशन मोडवर हाती घेण्यात आलेल्या या कामांसाठी मनरेगा योजना तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये 50 हजार रुपये शेतकऱ्यांचा सहभाग व 1 लाख रुपये शासनाचा वाटा अशा पद्धतीने निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी निधी मिळणार आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक असून, जानेवारी महिन्यापासून हे काम मिशन मोडवर हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
शेतकरी बांधवांच्या वाट्याला केवळ मूलभूत सुविधांअभावी येणाऱ्या अडचणी ध्यानात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्राधान्याने शेत आणि पाणंद रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि संबंधित सर्व यंत्रणांना शेत आणि पाणंद रस्त्यांच्या कामांबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्याबाबतही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे. शेत रस्त्यांच्या कामात कुणाकडून अडवणूक होत असल्यास संबंधित तहसीलदारांकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात काही अडचण असल्यास 8888627777 या क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तक्रार नोंदविण्याचे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा : आमदार राणाजगजितसिंह पाटील
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला असून या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. मिशन मोडवर सुरुवातीला रस्ते मोकळे करण्यात येणार आहेत. यात जर कोण आडकाठी आणत असेल तर संबंधित तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर लोकसहभागातून 50 हजार व शासनाचे 1 लाखातून मातीकाम करण्यात येणार आहे.त्यानंतर मजबुतीकरण करण्यासाठी 15 लाख निधी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
