वाशी (प्रतिनिधी)- शोषित, वंचित आणि कष्टकरी जनतेसाठी शंभर वर्षांपासून अखंड लढा देणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेच्या शताब्दीनिमित्त “भारतीय कम्युनिस्ट पक्ष संघर्ष आणि त्यागाची 100 वर्षे” हा भव्य जनजागृती कार्यक्रम लाखनगाव, ता. वाशी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. कॉ. अरुण रेणके व कॉ. पंकज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाने करण्यात आली. यानंतर सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच गरजू वयोवृद्धांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांमधून भाकप ही केवळ राजकीयच नव्हे तर समाजाशी नाते जपणारी चळवळ असल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. अरुण रेणके यांनी स्वातंत्र्यलढ्यापासून आजपर्यंत पक्षाने कामगार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी दिलेल्या संघर्षाचा सविस्तर आढावा घेतला. अन्याय, शोषण व विषमतेविरोधात लढा देणे हीच कम्युनिस्ट चळवळीची खरी ओळख असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. दिनकर तवले होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाकपच्या शंभर वर्षांच्या संघर्षाचा इतिहास, त्यागाची परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश देणारा हा शताब्दी कार्यक्रम जिल्ह्यात विशेष लक्षवेधी ठरला.
