धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती निमित्त; भारताला एक महान राष्ट्र बनवणाऱ्या संविधानाला सलाम करण्यासाठी व देशवासीयांनी आपले संविधान समजून घ्यावे, या उद्देशाने भारतीय इतिहास प्रबोधिनी मुंबई, जवाहर विद्यार्थी गृह नागपूर आणि देशभरातील विविध संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा ही ऑनलाईन असल्यामुळे आपण आपल्या घरी बसून सहभागी होऊ शकता. ही वक्तृत्व स्पर्धा विद्यालयीन, महाविद्यालयीन, खुला गट आणि विधी क्षेत्रातील व्यक्ती अश्या चार गटात होईल. सर्व सहभागींना सहभागाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळेल आणि प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांक 10000/-(ग्रंथ), द्वितीय क्रमांक 7000/- (ग्रंथ) व तृतीय क्रमांक 5000/-(ग्रंथ) अशी पारितोषिके ठेवलेली आहेत. तसेच सर्व गटात एकूण पाच उत्तेजनार्थ पारितोषिक 2000/- (ग्रंथ) आहे. पारितोषिकाचे स्वरूप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व ग्रंथ असे आहे.
सदर स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेशाची व व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 26 जानेवारी 2026 आहे. स्पर्धेचा निकाल 02 एप्रिल 2026 ला तर बक्षीस वितरण 26 एप्रिल 2026 ला होणार आहे. स्पर्धेचे गट, विषय, वेळ मर्यादा, नियम व अटी जाणून घेण्यासाठी 8424867070 किंवा 9373129563 या नंबर वरती वक्तृत्व स्पर्धेची माहिती पाठवा असा व्हाट्सअप ला मेसेज करावा. जास्तीत जास्त विध्यार्थी व नागरिकांपर्यंत या स्पर्धेची माहिती पोहचवून सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने डॉ. वर्षा चौरे यांनी केले आहे.