धाराशिव (प्रतिनिधी)- जगाच्या उद्धारासाठीच परमेश्वराने अवतार घेतला. सत्य, धर्म रक्षणासाठी परमेश्वर अवतार घेत असतो, असे प्रतिपादन भागवताचार्य हभप अमोल बोधले महाराज यांनी केले.
त्रैलोक्याचे स्वामी प.पू. श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित्त पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने धाराशिव येथील शांतीनिकेतन कॉलनी येथे आयोजित गुरूचरित्र पारायण, भजन, कीर्तन, अखंड दत्तनाम सप्ताह सोहळ्याची गुरूवारी (दि.4) काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटपाने उत्साहात सांगता करण्यात आली. यावेळी भागवताचार्य हभप बोधले महाराज यांनी धरी अवतार विश्व तारायवया.. या अभंगावर निरूपण करून कीर्तन केले. गवळणी गात प्रभूंच्या लहानपणींच्या लिलांची माहिती सांगितली. यावेळी हभप बोधले महाराज यांच्या हस्ते काल्याची हंडी फोडण्यात आली. श्री दत्तगुरूंचे आरती-पूजन करून भाविकांना काला व महाप्रसाद वाटप करण्यात आला. सकाळी श्री दत्तगुरूंच्या पादुकांचा महाभिषेक करण्यात आला. श्री गुरूचरित्र ग्रंथदिंडी काढण्यात आली. या मिरवणुकीत तेर येथील संत गोरोबाकाका वारकरी शिक्षण संस्था व मेडसिंगा येथील रावसाहेब बाबा पाटील महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवारकऱ्यांनी टाळ- मृदंगाच्या गजरात ठेका धरून उत्कृष्ट सादरीकरण केले. ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी भाविक महिलांनी आकर्षक रांगोळी रेखाटली होती. भाविकांनी या मिवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. सप्ताह सोहळ्यानिमित्त 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत गुरचरित्र पारायण, महिला भजनी मंडळाची भजन सेवा, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. या सप्ताह सोहळ्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, राजाभाऊ नाईकनवरे, लक्ष्मीकांत जाधव, प्रभाकर चोराखळीकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
