धाराशिव (प्रतिनिधी)- कुटुंब नियोजन हे केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे धोरण असून,त्याची जबाबदारी बहुधा महिलांवरच पडते. समाजात असलेल्या गैरसमज आणि भीतीमुळे पुरुष कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला पुढे येत नाहीत.या पार्श्वभूमीवर पुरुषांच्या सहभागात वाढ व्हावी,पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया आणि निरोध वापराला चालना मिळावी,यासाठी २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा केला जात आहे.
या विशेष पंधरवाड्याचे उद्दिष्ट पुरुष नसबंदीविषयी जागरूकता वाढविणे, पुरुषांसोबत समुपदेशन करून कुटुंब नियोजनातील त्यांची समान जबाबदारी पटवून देणे,तसेच समाजातील गैरसमज दूर करणे हे आहे.“स्वस्थ व आनंदी कुटुंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातूनच साकार” हे यावर्षीच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे.
पंधरवाडा दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.
पहिला टप्पा (२१ ते २७ नोव्हेंबर)
संपर्क आठवडा.यामध्ये आशा व आरोग्य सेविका यांनी सर्वेक्षण करून योग्य जोडप्यांच्या याद्या तयार केल्या असून पुरुषांना नसबंदी शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त केले जात आहे.
दुसरा टप्पा (२८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर)
सेवाकालावधी.या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पुरुष नसबंदीची गुणवत्ता पूर्ण व खात्रीशीर सेवा उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये स्त्री व पुरुष दोन्ही शस्त्रक्रिया उपलब्ध असून,याआधी नसबंदी केलेल्या लाभार्थ्यांमार्फतही जनजागृती आणि मोहिमेचा प्रसार करण्यात येणार आहे.यामुळे पुरुष नसबंदीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी कुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दिष्ट ६१४० असून एप्रिल २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या काळात एकूण ३२२९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.त्यापैकी ३२०२ महिला आणि फक्त ०९ पुरुष नसबंदी झाल्याने पुरुष सहभाग वाढविण्याची गरज अधोरेखित होते. या मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास यांनी आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या असून,हा पंधरवाडा प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले आहे.