धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीतून प्रत्येक जिल्ह्यात ‘पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना राबवली जात आहे. या योजनेमुळे अनेकांना रोजगार मिळत असून कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक नफा मिळविण्याची संधी उपलब्ध होत आहे.
जिल्ह्यात वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षित युवकांना उद्योग उभारण्यास भांडवलाची अडचण भासत होती. मात्र केंद्र शासनाने सुरू केलेल्या पीएमएफएमई योजनेमुळे उद्योग उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या योजनेत बेरोजगार, बचत गट,शेतकरी गट,संस्था, तसेच ॲग्रो कंपन्यांनाही अर्ज करता येणार आहे.विशेष म्हणजे,शासन एकूण कर्जावर 35 टक्के सबसिडी देत आहे,ज्यामुळे जिल्ह्यातील विविध संस्था,गट आणि इच्छुकांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे.
जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात येत आहे. पीएमएफएमई योजनेअंतर्गत 2024-25 व चालू वर्षांत जिल्ह्यात एकूण 481 प्रस्ताव मंजूर झाले असून 385 उद्योग प्रत्यक्ष सुरू झाले आहेत.यामध्ये खवा,गूळ उद्योग,डाळ उद्योग,बेदाणा,मसाला व पापड यांसारख्या अन्नप्रक्रिया क्षेत्रांचा समावेश आहे.
काय आहे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना : ही योजना केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत राबवली जात आहे.असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना असून कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे विविध प्रकारचे उद्योग यात उभारता येतात.
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अर्ज कसा करावा : अन्नप्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधता येते.या उद्योगासाठी शेतकरी,बचत गट,शेतकरी उत्पादक कंपनी आणि संस्था अर्ज करू शकतात.अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.pmfme.mofpi.gov.in <http://www.pmfme.mofpi.gov.in>
वैयक्तिक अर्जदार,बचत गट,शेतकरी गट,संस्था,ॲग्रो कंपन्या,सात-बारा नसले तरी लाभ मिळू शकतो.
शासनाकडून मिळणारी मदत :
प्रत्येक तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मानधन तत्त्वावर कर्मचारी नेमला आहे.प्रस्ताव दाखल करण्यापासून मंजुरीपर्यंत मोफत मार्गदर्शन उपलब्ध.उद्योग सुरू झाल्यावर शासन 35 टक्के अनुदान प्रदान करते.अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषि सहाय्यकाची मदत घेता येईल.
आपल्या जिल्ह्यात कच्च्या मालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग तुलनेने कमी आहेत.शासनाची ही योजना ग्रामीण भागातील युवकांसाठी आणि बचत गटांसाठी उत्तम संधी आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय,धाराशिव येथे संपर्क साधावा असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजकुमार मोरे यांनी कळविले आहे.