तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या फुलांपासून अगरबत्ती तयार करून निर्माल्याचे पावित्र्य जपणारा पर्यावरणपूरक उपक्रम श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने राबविण्यातस सुरुवात करण्यात आली आहे. दररोज देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तसेच देशभरातून हजारो भाविक तुळजापूरात येतात. दर्शनासाठी येणारे भाविक मोठ्या भक्तिभावाने देवींच्या चरणी फुले अर्पण करतात. वाढत्या भाविक संख्येमुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचत असल्याचे लक्षात घेऊन या निर्माल्याचा योग्य व पवित्र उपयोग करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे.
श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. या शुभप्रसंगी मंदिर संस्थानच्या वतीने तयार करण्यात आलेली सेंद्रिय अगरबत्ती भाविकांसाठी विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजपासून भाविकांना मंदिर परिसरातील लाडू विक्री केंद्रावरून ही अगरबत्ती खरेदी करता येणार आहे.
अगरबत्तीबरोबरच धूप, उद तसेच हवन कप देखील विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे सर्व उत्पादने रसायनमुक्त असून पूर्णतः सेंद्रिय असल्याने आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, लेखाधिकारी संतोष भेंकी, महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमराराजे कदम, अनंत कोंडो, सहायक धार्मिक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले, स्वच्छता निरीक्षक सुरज घुले, अक्षय साळुंके, नितीन भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली व फुलकारीचे विवेक कानडे यांच्या सहकार्यातून सदर उपक्रम राबविण्यात येणार आहे. मंदिर संस्थानच्या स्वच्छता विभागामार्फत हा उपक्रम राबवला जात असून स्वच्छता निरीक्षक सुरज घुले हे या उपक्रमासाठी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या उपक्रमामुळे निर्माल्य व्यवस्थापन, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि धार्मिक पावित्र्य यांचा सुंदर संगम साधला गेला आहे.
