उमरगा (प्रतिनिधी)- मानव जन्माला येतो तो कर्मभोगासाठी, संसार हा क्षणिक असून त्यात अडकून पडण्याऐवजी ईश्वर भक्तीचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. देह हा काळाच्या अधीन आहे, तर धनसंपत्ती ही कुबेराची आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर मनुष्याचा कायमस्वरूपी अधिकार नाही. अशा परिस्थितीत केवळ देवाकडील शरणागतीच मानवाला तारू शकते, असे मत हभप गुरूराज महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील मुळज येथील हनुमान मंदिरात सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्या निमित्त शुक्रवारी, दि 26 डिसेंबर रोजी आयोजित किर्तन सेवेत गुरूराज महाराज देगलूरकर बोलत होते. यावेळी वेदमुर्ती अशोक जोशी, महेश इनामदार, माजी व्हाइस चेअरमन सतिश जाधव, भारत शिक्षण संस्थेचे संचालक दिगंबर बिराजदार, रघुनाथ मुळजे, उध्दव चव्हाण, विजय चव्हाण, माधव औरादे, देवीदास चव्हाण, संजय घोटणे आदी उपस्थित होते. “आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन हे कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे,” संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा आशय उलगडताना देगलूरकर म्हणाले की, मानवाला पंचमहाभूतापासून उसना देह मिळालेला आहे, त्याला परत करावा लागणारा आहे. मानव जन्म अनमोल असून देह काळाच्या अधीन आहे, तर संपत्ती क्षणभंगुर आहे, अशा परिस्थितीत मनुष्याने गर्व कशाचा करावा?” असा थेट सवाल करत त्यांनी देव सोडून ईतराला शरण जावू नका पांडुरंगाच्या शरणागतीतच जीवनाचे कल्याण आहे, असे सांगत त्यांनी भक्ती मार्गाचे महत्त्व पटवून दिले. किर्तनात विविध उदाहरणे, अभंगांच्या ओळी आणि संतवचनांच्या माध्यमातून आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करण्यात आले. शेवटी किर्तनात संसारातील मोह, माया, लोभ आणि अहंकार यापासून दूर राहून नामस्मरण, सदाचार आणि भक्तीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले. यांवेळी गाव व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतवाणीचे मर्म उलगडले!
हभप देगलूरकर महाराज यांनी अभंगाच्या माध्यमातून तपाने देवाचं दर्शन होत नाही तर भजनाने दर्शन होते. नामस्मरणाला काळ, स्थळ, वेळेची मर्यादा नसतात, देवाचा धावा केला तर उशीर होईल पण संत आणि भक्तांचा धावा केला तर देव लवकर येतो, संतानी आत्मचिंतन, नामस्मरण आणि सदाचार याचा मार्ग दाखविला. असे सांगत त्यांनी संतवाणीचे मर्म सोप्या उदाहरणांतून उलगडले.
