कळंब (प्रतिनिधी)- भाटशिरपुरा शिवरातील दिनेश उद्योजक वाघमारे यांच्या शेतीत काम करणाऱ्या बिहार राज्यामधील पटणा जिल्ह्यातील एका कुटुंबातील 3 शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांच्या वयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपूरा शाळेत प्रवेश देऊन शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
भाटशिरपुरा गावातील उद्योजक दिनेश वाघमारे यांच्या शेतामध्ये बिहार मधील दुधेला, मनेरा जिल्हा पाटणा येथील बबलू यादव यांचे कुटुंब शेती कामासाठी आले असल्याचे उद्योजक दिनेश वाघमारे यांच्याकडून समजल्यावर वेळअमावस्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे व शिक्षक सचिन तामाने, शहाजी बनसोडे हे दिनेश वाघमारे यांना भेटण्यासाठी गेले. त्यांच्याकडून या ठिकाणी 6 ते 14 वयोगटातील तीन शाळाबाह्य मुले आहेत असे समजले. लगेच दिनेश वाघमारे, मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे, सहशिक्षक सचिन तामाने यांनी संबंधित मुलांचे पालक बबलू यादव यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून आपली मुलं शाळेत घेऊन यावेत व त्यांना प्रवेश घ्यावा अशी विनंती केला. दिनांक 23 रोजी सुधांशू कुमारी वय 7, कृष्णकुमार वय 8 व करणकुमार वय 9 या तीन विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली इयत्ता दुसरी व इयत्ता तिसरी मध्ये प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामावून घेण्यात आले.
यावेळी त्या सर्व नूतन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक श्रीकांत तांबारे,अमोल बाभळे, नागेंद्र होसाळे, राजाभाऊ शिंदे, लिंबराज सुरवसे, कालींदा मुंडे, राजकन्या तोडकर, गणपती तापिसे विद्यार्थ्याचे पालक बबलू यादव उपस्थित होते. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी नागेश मापारी गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते यांनी सर्व शिक्षकांच्या अभिनंदन केले.
