तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्याच्या समोर नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून लख्ख प्रकाशासाठी मर्क्युरी लाईट फोकस बसवला आहे. मात्र, या फोकससमोरच डिजिटल होल्डिंग उभारण्यात येत असल्याने महाराजांचा पुतळा रात्री अंधारात जात असून, विविध राज्यांतून दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत.

होल्डिंग बसविणाऱ्या संबंधित एजन्सींना वारंवार तोंडी तसेच नगरपालिकेमार्फत लेखी सूचना देऊनही जाणूनबुजून फोकससमोरच राजकीय डिजिटल होल्डिंग उभे केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे विनाकारण तणाव निर्माण होत असल्याचेही सांगण्यात आले.

हीच परिस्थिती छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळही असून, संरक्षण भिंतीसमोर गेटलगत उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर होर्डिंगमुळे आतला पुतळा दिसेनासा झाला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातही अशाच प्रकारचे होल्डिंग लावले जात असल्याचा आरोप आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यांच्या आजूबाजूला 50 मीटर अंतरात कोणतेही होल्डिंग लावण्यास मनाई असतानाही संबंधित डिजिटल फ्लेक्स एजन्सी सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. हे हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान असून, शहराचे विद्रूपीकरण करण्याचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डिजिटल होल्डिंगला विरोध नाही; मात्र ते लावताना भान ठेवून व नियमांचे पालन करूनच लावावेत, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. या प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून नूतन नगराध्यक्ष विनोद (पिटू) भैया गंगणे व नूतन नगरसेवकांना आवाहन करत, संबंधित एजन्सींवर प्रतिबंध घालून शिवाजी महाराज चौकातील फोकससमोरील होल्डिंग तात्काळ हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच नगरपालिका व पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की, बेकायदेशीर व विनापरवाना होल्डिंग लावणाऱ्या एजन्सींवर कायदेशीर कारवाई करावी, होल्डिंग जप्त करावीत व गुन्हे दाखल करावेत. योग्य कारवाई न झाल्यास औरंगाबाद खंडपीठात पुन्हा उपोषणास बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

नगरपालिकेने यापूर्वी लेखी पत्र देऊन या ठिकाणी डिजिटल फ्लेक्सला परवानगी दिली जाणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेतले होते. मात्र, पुन्हा हा प्रकार सुरू झाल्याने तातडीने गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस (अप)चे सोशल मीडिया प्रमुख बबनराव गावडे यांनी दिली आहे.

 
Top