तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर शहरात गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अपहरणाची धमकी देत वाईन शॉप चालकाकडून जबरदस्तीने माल उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमर श्रीराम नाईक (वय 52), रा. पंढरपूरकर गल्ली, तुळजापूर हे चेतन वाईन शॉप (जुने बसस्थानक परिसर) येथे असताना प्रशांत कांबळे, बालाजी जाधव व बाबा शेख (रा. तुळजापूर) या तिघांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला. आरोपींनी नाईक व त्यांच्या मुलास शिवीगाळ करत “तुझ्या मुलाला किडनॅप करू” अशी धमकी दिली.
यानंतर आरोपींनी दुकानातून 3,100 रुपयांचा माल जबर नेला. तसेच दरमहा 10,000 रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली. या प्रकरणी अमर नाईक यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 308(3), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.