धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाअंतर्गत इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) आयोजित “एरोसोल : मेजरमेंट्स रिट्रीवल अँड इम्पॅक्ट“व “अंडरस्टँडिंग द सायन्स बिहाइंड जिऑलॉजिकल हजार्ड्स फोर अर्ली वार्निंग अँड मेगिटेशन मेजर्स“ या दोन राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळा दिनांक 17 व 19 डिसेंबर रोजी राबवण्यात आल्या.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे आऊटरिच नोडल सेंटर म्हणून कार्य करते, या अंतर्गत इस्रो आयोजित विविध कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित केले जातात. याच अंतर्गत या दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत वायू प्रदूषण आणि आरोग्य, एरोसोल व त्याचे परिणाम, नवीन तंत्रज्ञान, जागतिक समस्या व नियंत्रणासाठीच्या उपाय योजना अशा विविध घटकांबद्दल सखोल मार्गदर्शन व चर्चा इस्रोतील शास्त्रज्ञांनी केली. एरोसोल हे हवेतील सूक्ष्म कण असतात, जे वाहनांमधून निघणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि इतर घटकांमुळे तयार होतात. हे कण श्वसनमार्गात जाऊन फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतात आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करतात. तसेच पर्यावरणातील बदल, प्रदूषण व आपली जबाबदारी याबद्दलचे सखोल मार्गदर्शन सदर कार्यशाळेमध्ये करण्यात आले.सदर कार्यशाळेसाठी इस्रो देहरादून येथील डॉ. सुरेश चॅटर्जी, डॉ. प्रतिमा पांडे, डॉ. फरहान काझी व डॉ. मनू शर्मा असे विविध शास्त्रज्ञ व अभ्यासक साधन व्यक्ती म्हणून लाभले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व इसरो नोडल सेंटर समन्वयक डॉ. कुणाल वनंजे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अभयसिंह खुणे यांनी केले तर आभार प्रा. संजय घोडके यांनी मानले. या कार्यशाळेसाठी आय क्यू ए सी समन्वयक डॉ. मंगेश भोसले, प्रा.अक्षय स्वामी, प्रा. गोविंद साळुंखे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
