तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या मतदारांनी नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला कौल दिल्याने आता शहराच्या सर्वांगीण विकासाची मोठी जबाबदारी भाजपावर येऊन पडली आहे. विकासाच्या मुद्द्यावर नेहमी ठाम भूमिका घेणाऱ्या तुळजापूरकरांनी या निकालातून स्पष्ट संदेश दिला असून, “काम कराल तरच पाठिंबा” ही परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना सुमारे 6 हजार मतांचे मताधिक्य, तर विधानसभेत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना 3,500 मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी तब्बल 1,680 मतांनी विजय मिळवला. या तिन्ही निकालांतून तुळजापूरचा मतदार विकासाच्या बाजूने उभा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
विकासासोबत विस्थापन टाळण्याचे आव्हान
तीर्थक्षेत्राचा विकास करताना स्थानिक नागरिक विस्थापित होणार नाहीत, याची काळजी घेणे हे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. भाविकांची वाढती संख्या, सुविधा, स्वच्छता, वाहतूक, पार्किंग, पाणीपुरवठा ड्रेनेज लाईन सक्षमीकरण आणि सौंदर्यीकरण या मुद्द्यांवर समतोल विकास साधावा लागणार आहे.
तुळजापुरात भाजपाला मिळालेला हा विजय म्हणजे संधी आणि जबाबदारी दोन्ही आहे. राज्यभरात भाजपावर “ड्रग्स, गुंडगिरी आणि कायदा-सुव्यवस्थे”बाबत होणारी टीका दूर करण्याची संधी या निकालामुळे मिळाली आहे. यापुढे तुळजापुरात शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि पारदर्शक विकासकामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. येथील कामगिरीवरच भाजपाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष अमर मगर सह अन्य उमेदवारांनी चांगली लढत दिली. मात्र खालची बाजू कमकुवत असल्याने याचा फटका महा विकास आघाडीला बसला. विशेष म्हणजे काही उमेदवार अत्यंत गरीब वर्गातून आले होते. त्यांनी मिळवलेली मते ही भाजपसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली आहेत. दुसरीकडे भाजपचे काही उमेदवार एक आणि दोन अंकी मतांवरच अडकले, ही बाब पक्षासाठी चिंतेची आहे.
तरुण चेहऱ्यांचे आव्हान आणि अनुभवी विरोधक
भाजपचे बहुतांश नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका या तरुण आणि प्रथमच निवडून आलेले आहेत. त्यामुळे सभागृह चालवताना नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. महाविकास आघाडीकडून अमोल कुतवळ, आनंद जगताप आणि अनुभवी नगरसेवक रणजित इंगळे यांसारखे दिग्गज सभागृहात असल्याने भाजपला प्रत्येक निर्णयात सावध पावले टाकावी लागणार आहेत.
माजी नगराध्यक्षांचा पराभव: आत्ममंथनाची वेळ आहे
या निवडणुकीत भाजपचे तीन माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर, सचिन रोचकरी यांना पराभव स्वीकारावा लागला, तर भाजप तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांच्या चुलती माजी नगराध्यक्षा जयश्रीताई कंदले यांचा अवघ्या काही मतांनी नवख्या उमेदवाराकडून विजय झाला. हे निकाल भाजपसाठी निश्चितच आत्ममंथन करायला लावणारे आहेत.
मोठ्या निधीतून विकासाची संधी!
तुळजापूरसाठी मोठ्या निधीची शक्यता असल्याने तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याची सुवर्णसंधी सध्या उपलब्ध आहे. प्रशासक काळात विकास आराखडा तयार झाला असला, तरी आता प्रत्यक्ष अंमलबजावणीत नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. त्यामुळे विकास आराखड्याला लोकप्रतिनिधींचा चेहरा आणि दिशा मिळणार आहे.
भविष्यासाठी दिशा ठरवणारा कौल
एकंदरीत, तुळजापुरच्या मतदारांनी भाजपाला केवळ सत्ता नाही तर अपेक्षांचा मोठा भार दिला आहे. हा विजय भाजपासाठी संधीही आहे आणि कसोटीही. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी एकत्र येऊन पारदर्शक, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक विकास केला तरच तुळजापूर विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल, अन्यथा हा कौलच भाजपासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.